सातारा : सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत कारखाना चालविणे हेच मोठे आव्हान असताना भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखाना हा तालुक्यातील सक्षम व प्रगत कारखान्यांपैकी एक असून, त्यांच्याकडे डिस्टिलरी, को-जनरेशनसह विविध पूरक प्रकल्प आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर व वेळेवर सुविधा देण्याची क्षमता आहे. त्यामुळे श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्यास त्यांची निवड करण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. श्रीराम सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये आणि तो बंद राहिल्यास त्याचा राजकीय व आर्थिक फायदा होईल, या उद्देशाने काही विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, श्री दत्त इंडियाने सर्वाधिक वार्षिक भाड्याचा प्रस्ताव दिल्याने सर्वसाधारण सभेने सर्वानुमते त्यांच्याकडे कारखाना संचालन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संचालक मंडळाचा नसून जनरल बॉडीचा आहे. साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. यापूर्वी कारखाना चालवणाऱ्या जवाहर उद्योग समूहाने तो चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे कारखाना बंद पडू नये, तसेच शेतकरी व कामगारांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. कारखान्याकडे शरयू अॅग्रो व श्री दत्त इंडिया असे दोन प्रस्ताव आले होते. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, उपाध्यक्ष नितीन शाहूराजे भोसले, संचालक संतोष खटके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


















