सातारा : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. २१) मतदान होत आहे. त्यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांत १५३ गावांत मतदान केंद्रे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. २३) होईल. मार्केट यार्ड गेट क्रमांक सहा येथील वखार महामंडळ गोदामात सकाळी आठपासून मतमोजणीस प्रारंभ होईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडावी, यासाठी मनुष्यबळ, साहित्य आणि सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कमालीचे वातावरण तापले आहे. उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी होत आहेत. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. याविषयी निवडणूक अधिकारी यादव म्हणाल्या की, कार्यक्षेत्रातील कऱ्हाडच्या ६५, वाळव्याच्या ४२, कडेगावच्या २०, तर खानापूरमधील तीन गावांचा समावेश आहे. कारखान्याच्या सहा ऊस उत्पादक गटांपैकी काले कार्वे गटात सर्वाधिक ९,४८१, तर वडगाव हवेली-दुशेरी गटात ९,२७६ मतदार आहेत. गट क्रमांत तीन नेर्ले- तांबवे गटात ८,८८३, गट क्रमांक चार रेठरे हरणाक्ष, बोरगाव गटात ८,६०४, गट क्रमांत सहा रेठरे बुद्रुक, शेणोली गटात ७,६८१, तर गट क्रमांक पाच येडेमच्छिंद्र, वांगी गटात ६,३२७ मतदार आहेत. १३० गावांत ५० हजार २५२ सभासद संचालक मंडळ निवडणार आहेत. सातारा जिल्ह्यात ८९, तर सांगली जिल्ह्यात ६४ अशी १५३ मतदान केंद्रे आहेत. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होईल. मतदानास येताना निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या १४ ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. मूळ ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही


















