सातारा : लोकनेते देसाई कारखान्याकडून इतरांच्या बरोबरीने दर देण्याची यशराज देसाईंची घोषणा

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने पहिला ऊस हप्ता देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी दिली. दौलतनगर येथे झालेल्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात यशराज देसाई बोलत होते. पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक असून कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आहे. दोन ते तीन दिवसांत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल. कार्यक्षेत्रातील ऊस अन्यत्र जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देसाई यांनी केले. कारखान्याच्या कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणाही त्यांनी केली.

गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. संचालक रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नी वत्सला पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ माजी संचालक लक्ष्मण बोर्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, साखरेची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्यांच्या हितासाठी साखर कारखाने लवकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. देसाई कारखान्याने मागील काही गळीत हंगामात काटकसरीचे धोरण स्वीकारून उसाची एफआरपी देण्यासाठी बँकेचे कर्ज न घेता आर्थिक नियोजन साधले, ही बाब उल्लेखनीय आहे. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवीराज देसाई, सभापती सविता पवार, संचालक, अधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पांडुरंग नलवडे यांनी स्वागत केले, सोमनाथ खामकर यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here