शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस; साखर वाहतूक रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : साखरेची एमएसपी प्रती किलो 50 रुपये करावी, इथेनॉल खरेदी दरात वाढ करावी आणि लवकर ऊसतोड होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांनी बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन सुरू केले आहे. आज (१४ ऑक्टोबर) आंदोलनाचा दुसरा दिवस असून, सरकारकडून अद्याप शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्यांतून बाहेर पडणारी साखर रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊस घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या २४ तासांपासून विस्कळीत झाली असून, पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसला आहे. पर्यायी मार्गांवरही मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटकातील हत्तरगी आणि कोगनोळी टोलनाक्यांच्या परिसरात शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. मंगळवारी राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच मुक्काम केला. परिसरातील गावकऱ्यांनी आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली. बुधवारी सकाळपासून पुन्हा महामार्गावर आंदोलन सुरू करण्यात आले. सरकारने अद्याप मागण्यांची दखल न घेतल्याने आता साखर कारखान्यांतून बाहेर पडणारी साखर रोखण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here