सोलापूर : राज्याचा साखर हंगाम बंद होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पैैसे मिळालेले नाहीत. कारखान्याला ऊस पाठवून शेतकरी पैशांसाठी पायऱ्या झिजवत आहेत.दीड वर्ष जोपासलेला ऊस घालून पाच महिने झाले. मात्र, कारखानदार पैसे देण्यास तयार नाहीत. सद्यस्थितीत राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३९६ कोटी रुपये थकीत आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ८८ कोटी रुपये थकीत आहेत. गळीत हंगाम घेतलेल्यांपैकी १५४ कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिले आहेत. उर्वरित ५६ साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे ३९६ कोटी रुपये देणे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे ८८ कोटी रुपये थकले आहेत. मात्र गोकुळ शुगर या एका कारखान्याकडे १३० कोटी रुपये थकीत आहेत. मात्र, कारखान्यावर आरआरसी कारवाई सुरू आहे. त्यामुळे आयुक्तालयाकडील यादीत या थकबाकीचा उल्लेख नाही. थकबाकीदार आठ कारखान्यांपैकी सिद्धेश्वर कारखान्याकडे ३० कोटी ५४ लाख रुपये, संत कुर्मदास कारखाना – १५ कोटी ९८ लाख रुपये, अवताडे शुगर ३५९ लाख रुपये, कमलाभवानी करमाळा ९ कोटी रुपये आणि जयहिंद शुगरकडे ४० लाख रुपये थकीत आहेत. याबाबत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नामदेव पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे साखर कारखान्यांनी वेळेत देणे अपेक्षित आहे. ऊस लागवडीपासून तोडणीसाठी शेतकऱ्यांना पैसे खर्च करावे लागतात. ऊसतोडणी झाल्यानंतर शेती मशागतीसाठी पैसे खर्च केल्याशिवाय पर्याय नसतो. असे असताना साखर कारखानदार उसाचे पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी सरकारने कायद्यात बदल करणे आवश्यक आहे.


















