सोलापूर : जिल्ह्यातील ३५ कारखान्यांनी मागील गळीत हंगामात १ कोटी ६३ लाख ३७ हजार २१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी ४ हजार ३३७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असले, तरी केवळ १२ कारखान्यांनीच जाहीर केलेल्या अंतिम दरानुसार संपूर्ण ऊसबिले अदा केली आहेत. उर्वरित २३ कारखाने अद्यापही शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात असतानाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर थकीत ऊसबिलांचेही मोठे ओझे आहे. साखर आयुक्तालयाच्या १५ जुलैअखेरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात तब्बल ३६३ कोटी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. यामध्ये सहा कारखान्यांकडील ६१ कोटी रुपयांच्या एफआरपीचाही समावेश आहे.
साखर आयुक्तालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने थकीत ऊस बिलांपोटी गोकुळ शुगर (धोत्री), भीमा आणि संत कुर्मदास या कारखान्यांवर आरआरसी कारवाई सुरू केली आहे. तर कारवाई टाळण्यासाठी काही कारखाने केवळ एफआरपीची पूर्तता करत असून, जाहीर केलेल्या अंतिम दरानुसार ऊसबिले देण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, अनेक कारखाने संपूर्ण ऊसबिले न देता ती जमा केल्याची खोटी माहिती सादर करत आहेत. याबाबत साखर आयुक्तांना समक्ष भेटून निवेदन दिले आहे. त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना तातडीने चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. साखर कारखानदारांनी पैैसे थकवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा कारखान्यांवर कारवाईचा वेग वाढण्याची गरज आहे.


















