सोलापूर : जिल्ह्यातील ३६ पैकी २३ साखर कारखान्यांकडे अंदाजे २७६ कोटी ८४ लाख रुपयांची एफआरपी थकली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे चुकीची कागदपत्रे जमा करून मोठ्या प्रमाणात एफआरपी जमा केल्याचे दाखविले आहे. परंतु, शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली नसल्याचे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत. ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली आहे.ऊस गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही ऊस बिले दिली नाहीत. परंतु, कार्यालयीन रेकॉर्डनुसार थकीत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची बिले शेतकऱ्यांना एफआरपी कमी दाखवत असून, बहुतांश कारखान्यांनी दिल्याचे दाखविले आहे.
याबाबत रयत क्रांती संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमोल वेदपाठक यांनी सांगितले की, गाळप हंगाम संपून दोन महिने पूर्ण होत आहेत. अद्यापही बऱ्याच साखर कारखान्यांनी उसाची बिले दिली नाहीत, अशा कारखान्यांनी शेतकऱ्यांना व्याजासह बिले द्यावीत, अन्यथा साखर कारखान्यांसमोर आंदोलन करण्यात येईल. तर ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य सुहास पाटील म्हणाले की, साखर हंगाम सुरू होत असताना सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३,००० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबजावणी अनेक कारखान्यांनी केली नाही. त्यामुळे अशा साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी.


















