सोलापूर : साखर आयुक्तालयाने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील पाच कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटी दूर करत हे अहवाल राज्य सरकारकडे पाठवले आहेत. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) काढण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली आहे. आता सरकारकडून हा प्रस्ताव पुन्हा ‘एनसीडीसी’कडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिद्धेश्वर कारखान्याला १९९ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुणे आयुक्तालयातील साखर संचालक यशवंत गिरी यांनी या माहितीला दुजोरा दिला. राज्य सरकारमार्फत पाठविण्यात आलेल्या कर्ज मंजुरी प्रकरणात पाच कारखान्यांनी आवश्यक खुलासे व पूर्तता अहवाल सादर केले आहेत. ते पुढील निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले असून सरकारकडून त्यावर कार्यवाही झाल्यानंतर प्रकरण ‘एनसीडीसी’कडे जाईल असे ते म्हणाले.
साखर आयुक्तालयाच्या या प्रयत्नांनी आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिलासा मिळू शकेल. ‘एनसीडीसी’मार्फत सहकारी साखर कारखान्यांना भांडवली गुंतवणूक आणि खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. राज्य सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या कर्जप्रस्तावांमध्ये काही त्रुटी आढळल्याने सिद्धेश्वर कारखान्यासह अनेक कारखान्यांची कर्जमंजुरी रखडली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार संबंधित कारखान्यांकडून खुलासे आणि पूर्तता अहवाल मागविण्यात आले होते. सिद्धेश्वर कारखान्याने आवश्यक माहिती आणि खुलासे सादर केल्यानंतर त्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने सरकारकडे पाठविला आहे. सरकारकडून अंतिम पडताळणीनंतर हा प्रस्ताव ‘एनसीडीसी’कडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी म्हणाले की, त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सरकारकडे गेल्याने कर्जमंजुरीच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.


















