सोलापूर : यंदा मान्सूनने दडी मारली आहे. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने अनेक गावांमध्ये चारा म्हणून उसाची तोडणी सुरू आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन तसेच साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गाळपासाठी कारखान्यांची लगबग सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील उपलब्ध उसावर लगतच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांची नजर असून, यंदा ऊस मिळविण्यासाठी मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. त्यातून ऊस दरासाठीही स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. माळशिरस तालुक्यात उसासाठी फलटण तालुक्यातील शरयू, स्वराज, श्रीराम, साखरवाडी येथील चार साखर कारखाने, बारामती तालुक्यातील माळेगाव, भवानीनगर, सोमेश्वर तसेच सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे अन् श्रीपूर येथील कारखान्यांचे लक्ष असेल.
ऊस मिळविण्यासाठी आतापासूनच साखर कारखान्यांकडून खरेदी प्रयत्न सुरू झाले आहेत. माळेगाव (जि. पुणे) साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् संचालकांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यंदा उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. पहिल्या दिवसापासूनच कार्यक्षेत्राबाहेरील लगतच्या तालुक्यांमधून ऊस आणण्यासाठी तोडणीच्या टोळ्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदा सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाल्याने आगामी गळीत हंगामात उसाचे क्षेत्र अन् उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी उसाचे एकरी उत्पादन घटण्याबरोबरच वजनातही घट होणार आहे. त्यामुळे कारखानेही सावध झाले आहेत. माळेगाव कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते यांनी सांगितले की, मागील वर्षी कारखान्याचा साखर उतारा १२.२८ टक्के होता. एफआरपीपोटी तीन हजार ४६९ रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये ज्यादा रक्कम करून यंदा पहिला हप्ता ३५०० रुपये दिला जाणार आहे. यंदा १३ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.


















