सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. १५ जुलै रोजी कारखान्य़ाची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय, कारखाना प्रशासनाने संपूर्ण प्लांट, मशिनरीसह १० वर्षांसाठी सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवली आहे. विशेष सभेत या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. आमदार व चेअरमन नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, दि. १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता ही विशेष सर्वसाधारण सभा होईल. सभेपुढे शासनाच्या दि. ०८/०९/२०२० च्या निर्णयाप्रमाणे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम २० नुसार आदिनाथ कारखाना सहकारी किंवा खासगी कंपनीला सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्याबाबत निर्णय घेणे हा विषय आहे.
कारखाना हंगाम २०२६-२७ ते २०३४-३५ या १० वर्षासाठी सहयोगी तत्त्वावर देण्यात येणार आहे. यापूर्वी सुरुवातीला कारखान्याचा बारामती अॅग्रोबरोबर भाडेकरार झालेला होता. मात्र, याविरोधात तत्कालीन संचालकांनी कोर्टात दावा दाखल केला. बँकेनेही कर्जासंदर्भात दावा दाखल केला आहे. तर सत्ताधारी संचालक मंडळाने कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला असला तरी कोणत्याही सभासद शेतकरी, ऊस उत्पादक व वाहतूकदारांना विचारात घेतलेले नाही. याला काही सभासदांनी विरोध केला आहे. कारखाना सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी (७ जुलै) कारखान्याच्या गेटसमोर उदयसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सभासद शेतकरी उपोषण आंदोलन करणार आहेत. दरम्यान, कारखाना चालविण्यास घ्यायला बारामती अॅग्रो, बाबूराव बोत्रे-पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असे तिघेजण इच्छुक सल्याची चर्चा आहे.


















