पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी सोलापूरमधील गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमिटेड (धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) या खासगी कारखान्यांवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. गाळप उसाची थकीत एफआरपीची रक्कम तब्बल १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपये असून या रकमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याजही वसूल करण्याचे आदेश आहेत.
ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाची किमान १४ दिवसांत एफआरपी शेतकऱ्यांना देणे प्रत्येक कारखान्यावर बंधनकारक आहे. अन्यथा, विलंब कालावधीकरिता १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद असूनही गोकुळ शुगरने एफआरपीपोटी रक्कम थकीत ठेवली आहे. सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक या कार्यालयास हंगाम २०२५-२६ मधील एकूण गाळप, ढोबळ एफआरपी, ऊस तोडणी व वाहतूक खर्चाबाबतची माहिती मागणी करूनदेखील कारखाना सादर करीत नाही. साखर आयुक्तालयात सुनावणीस कारखान्याकडून प्रतिनिधी उपस्थित राहत नाहीत.
गोकुळ शुगर्सच्या थकीत रकमेवर १५ टक्के दराने देय होणारे व्याज या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करून त्यामधून ही रक्कम वसूल करण्यात यावी. साखर साठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून या मालमत्तेवर दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद घ्यावी. या मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पद्धतीने विक्री करून या रकमेतून कारवाई करण्यास जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेश दि. १५ मे रोजी जारी केले आहेत.
कारखान्याकडून ३ लाख ६७ हजार ५०० मे. टन गाळप
कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टन गाळप केले, असे गृहित धरून हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याने ३ लाख ६७ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. कारखान्याचा बेसिक साखर उतारा १०.२५ टक्के गृहित धरल्यास ३५५० मे. टनाप्रमाणे कारखान्याकडे १३० कोटी ४६ लाख २५ हजार रुपये एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशातील तरतुदीनुसार साखर कारखान्याकडील एफआरपीप्रमाणे ऊसदराची थकीत रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी आदेश पारित केले आहेत.


















