सोलापूर : येथील श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम कृषी व संलग्न महाविद्यालयाच्यावतीने ‘एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी स्मार्ट शेती कार्यशाळा व पालक सभा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला शेतकरी, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कृषिभूषण डॉ. संजीव माने यांनी मार्गदर्शन केले. ‘नियोजनबद्ध शेती, योग्य तंत्रज्ञान आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन यांच्या माध्यमातून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ करणे शक्य आहे,’ असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त शेती पद्धती आणि स्मार्ट शेतीचा प्रभावी वापर केल्यास शक्य होते, असा सल्ला माने यांनी यावेळी दिला.
कृषी तज्ज्ञांनी ऊस उत्पादनवाढीसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, पीक संरक्षण, जमिनीचे आरोग्य आणि उत्पादनक्षम शेती नियोजन या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. संजीव माने तसेच ऊसभूषण शेतकरी लक्ष्मणराव आप्पासाहेब सुळ-पाटील यांनी ऊस उत्पादनातील प्रत्यक्ष अनुभव सांगून आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक पोषण व्यवस्थापन व तांत्रिक बाबींवर महाधनचे एरिया मार्केटिंग मॅनेजर योगेश म्हसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव अॅड. अभिषेक पाटील, समन्वयक प्रमोद झगडे, विनोद बाबर, श्रीराम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी हाके, प्राचार्य प्रा. पांडुरंग तुकाराम कोळेकर, श्रीराम कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुगंध शिंदे तसेच आयआयटीचे प्राचार्य मुंडफणे उपस्थित होते.


















