सोलापूर : दुष्काळाच्या झळांनी यंदा जिल्ह्यातील साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाकडे नोंदणी झालेल्या उसात गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३२ हजार ९४८ हेक्टरची घट झाली असून, २ लाख २७ हजार ५२ हेक्टरच ऊस गाळपासाठी उपलब्ध राहणार आहे. गतवर्षी हे क्षेत्र २ लाख ६० हजार हेक्टर होते. त्यामुळे यंदा ऊस क्षेत्रात तब्बल १२.७ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे यंदा कारखाने रडतखडतच सुरू राहतील अशी परिस्थिती आहे. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर ऊस चाऱ्यासाठी तोडला जाणार आहे, पाऊस आणि पाण्याअभावी जिल्ह्यात सध्या उभ्या उसाची वाढ खुंटल्याने उत्पादकतेत घट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांना बसण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गाळपासाठी उपलब्ध ऊस क्षेत्रात मोठी घट होणार आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अक्कलकोट तालुक्याकडे दृष्टिक्षेप टाकला असता असे दिसून येते की, तालुक्यातील २५ टक्के ऊस चाऱ्यासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. करमळा तालुक्यातील चारपैकी दोन साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता आहे. शिवगीरी आणि कमलाभवानी या कारखान्यांनी ऊस गाळपाची तयारी सुरू केली आहे. मोहोळ तालुक्यात पाच लाख मेट्रिक टन उसाची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात उसाची पळवाापळवी केली जाणार आहे. चाऱ्यासाही ऊस तोडणीही अधिक होईल. माळशिरस तालुक्यातील उसावनर पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कारखान्यांची नजर आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात गाळप क्षमतेच्या तुलनेत १५०० ते २००० हेक्टर उसाची तूट जाणवत आहे. पंढरपूर तालुक्यात ऊस उत्पादन २५ टक्क्यांनी कमी होण्याचा धोका आहे.


















