सोलापूर : बंद पडलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासनाकडे कर्ज मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, काही अदृश्य शक्तींनी विरोध केल्यामुळे कर्ज मंजूर होऊ शकले नाही. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचाही पर्याय स्वीकारण्याची तयारी होती; मात्र त्यालाही अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास परवानगी द्यावी किंवा विद्यमान संचालक मंडळाला आवश्यक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे कायम असल्याची माहिती आमदार तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. लिलाव प्रक्रियेतून कारखाना खरेदी करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आदिनाथ कारखान्याची सुमारे ४५० कोटी रुपयांची मालमत्ता असताना तो अवघ्या १२० कोटी रुपयांत लिलावातून घेण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा आमदार नारायण पाटील यांनी केला. अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, आम्ही वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढू, प्रसंगी रक्त सांडू; मात्र सभासद आणि कामगारांच्या घामाचा पैसा कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही. कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील राजकारणासाठी सहकाराचे मंदिर असलेल्या आदिनाथ कारखान्याचा बळी देऊ नये, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक देवानंद बागल, डॉ. हरिदास केवारे, डॉ. अमोल घाडगे, अॅड. राहुल सावंत, किरण कवडे, विजयसिंह नवले, दत्तात्रय गव्हाणे, दत्ताबापू देशमुख, श्रीमंत चौधरी, रवीकिरण फुके, आबासाहेब अंबारे, हनुमंत सरडे, रामेश्वर तळेकर, महादेव पोरे आणि संतोष खाटमोडे पाटील उपस्थित होते.


















