सोलापूर : धोत्री येथील ‘गोकुळ शुगर’ कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून गेल्या ११ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, गुरुवारी (ता.४) या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले. आंदोलकांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. अक्कलकोट आणि धाराशिव जिल्ह्यातील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी प्रादेशिक साखर कार्यालयावर ‘अर्धनग्न मोर्चा’ काढला. आंदोलनाचे नेते ॲड. अमोल पाटील यांनी साखर प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. दूरध्वनीवरून संपर्क साधणारे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यावर आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार केला. शनिवारी हे १४ व्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले. तीव्र आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंदोलनादरम्यान प्रभारी सहसंचालक आबासाहेब गावडे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्याशी ॲड. अमोल पाटील यांचा फोनवरून संवाद घडवून आणला. यावेळी पाटील यांनी, साखर आयुक्त कार्यालयाचा गाळप परवाना नसतानाही ‘गोकुळ शुगर’ने ३ लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केलेच कसे? प्रादेशिक साखर कार्यालयाने वेळीच कारवाई केली असती तर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकले नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे बुडण्यास हे कार्यालयच पूर्णपणे जबाबदार आहे असे सुनावले. शेतकरी बाळासाहेब मोरे यांनी गोकुळ शुगरवर आधीच मोठे कर्ज असल्याने थेट ‘आरआरसी’ (महसुली जप्ती) कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे साखर आयुक्तांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केली.


















