सोलापूर : गव्हाणीत मोळी टाकण्यापूर्वी ऊस दर जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी

सोलापूर : १५ ऑक्टोबरपासून राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होणार असताना अगोदर ऊस दर जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या विशेषतः उसाच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दरवर्षीच आक्रमक होतात. यावर्षी आता जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यंदाच्या हंगामासाठी एकत्र आल्याचे दिसत आहे. पाऊस नसल्याने अगोदरच उसाचे वांदे झाले असताना मोळी टाकण्याअगोदर दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी सर्वच शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकवटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी सांगितले की, साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसाठी भरारी पथकात शेतकरी चळवळीतील दोन पदाधिकारी घ्यावेत, उसाचे वजन बाहेर कुठेही करुन आमच्या कारखान्याला ऊस घाला, असे आवाहन कारखानदारांनीच करावे.

प्रा. सुहास पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी कुठेही ऊस वजन करून आणण्याचे आवाहन कारखानदारांनी करावे, अशी आमची मागणी आहे. साखर आणि ऊस वजन करण्यासाठी एकच वजन काटा असला पाहिजे अशी मागणी असल्याचे प्रा. सुहास पाटील यांनी सांगितले. मागील वर्षी साखर कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा यंदा अशा कारखान्यांसमोर आंदोलन केले जाईल. साखर विक्री दर प्रति किलो ५० रुपये करावा व इतर मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे प्रा. सुहास पाटील यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here