सोलापूर : धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील दोनशे शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोत्रे येथील गोकुळ शुगरने थकवलेल्या ऊस बिलांप्रश्नी आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत खात्यात पैसे जमा होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. काल, बुधवारी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कार्यालयात शेतकरी नेते आणि गोकुळ साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या गेटवर गेल्या तीन दिवसापासून दोनशेपेक्षा जास्त शेतकरी आंदोलन करत आहेत. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे येथे पाणी, शौचालय आणि औषधांची व्यवस्था करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले, गोकुळ कारखान्याने १३० कोटी रूपयांची ऊसबिले थकविली आहेत. साखर आयुक्तांनी दिलेल्या पत्रानुसार तहसीलदाराकडून आरआरसी कारवाई सुरू करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांना उसबिले देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर तहसीलदार जमदाडे यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत या कारखान्यावर आरआरसी कारवाई करुन शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल जमा करण्यात येईल. मात्र, शेतकऱ्यांनी आम्हाला आताच ऊस बीले खात्यावर पाहिजेत, अशी मागणी कायम ठेवली. याबाबत धाराशिवचे शेतकरी संघटनेचे नेते अॅड. अमोल पाटील म्हणाले की, कारखान्यावर आरआरसी कारवाई करुन पैसे जमा करणार असल्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले आहे. परंतु ही कारवाई होण्यास विलंब लागणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून रक्कम मिळाली नाही. व्याजासकट खात्यात बिले जमा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.


















