सोलापूर : रोपळे व परिसरात यंदा पावसाने दडी मारल्याने जमिनीतून नुकतेच उगवलेले गवत करपून गेले आहे. त्याचा थेट परिणाम पशुपालनावर झाला असून, दरवर्षी नैसर्गिक गवतावर तग धरणाऱ्या जनावरांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माळराने यंदा पावसाअभावी ओसाड पडली आहेत. रोपळे व परिसरात सुमारे ५,००० जनावरे आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास चाऱ्याची टंचाई तीव्र होण्याबरोबरच दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जनावरांच्या पोटासाठी शेतकरी आता उभा ऊस कापत आहेत. चाऱ्यासाठीच्या उसाचा भाव प्रतिगुंठा सुमारे तीन हजार रुपयांवर पोचला आहे.
पशुपालक म्हणाले की, दरवर्षी या दिवसांत आमची जनावरे माळावरील गवतावर चरत असतात. पण यंदा गवत उगवतानाच सुकले. उन्हाळ्यात वीज मिळाली नाही, त्यामुळे चारा पिके घेता आली नाहीत. आता ऊस विकत घेऊन जनावरे जगवत आहोत. तर रोपळे पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत नुकताच वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत ९० शेतकऱ्यांना मका व ज्वारीच्या चारा बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. मात्र, हा चारा उपलब्ध होण्यासाठी सुमारे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यंदा उन्हाळ्यात पुरेसा वीजपुरवठा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना चारा पिकांची लागवड करता आली नाही. त्यामुळे साठवून ठेवलेला सुका चाराही आता संपत आला आहे. पर्याय नसल्याने अनेक पशुपालक जनावरे जगवण्यासाठी उभ्या उसाचा चारा म्हणून वापर करत आहेत. खरीप हंगामाबरोबरच आता पशुधनाचीही चिंता वाढली आहे. मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी जनावरांना केवळ ऊस चारा म्हणून दिल्यास त्यांच्या शरीरातील कॅल्शिअम कमी होऊन दुग्धज्वरासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे इतर चारा, खनिज मिश्रण द्यावे. उसाच्या वाढ्याला चुन्याच्या निवळीची प्रक्रिया करून दुसऱ्या दिवशी वाळवून खाऊ घालावा, असा सल्ला दिला आहे.


















