सोलापूर : जकराया शुगरकडील थकीत ऊस बिलप्रश्नी जनहित शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

सोलापूर : वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया शुगर कारखान्याने गाळप हंगामात उसासाठी प्रतिटन १ हजार ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते. मात्र, उर्वरित रक्कम प्रतिटन ३ हजार रुपये व त्यावरील १५ टक्के व्याजासह देणे नियमानुसार बंधनकारक असतानाही कारखाना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारखान्याला थकीत रक्कम देण्यास भाग पाडावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनप्रसंगी देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या दरापैकी केवळ ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित रक्कम अद्याप दिलेली नाही. थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला हवी. या आंदोलनात बिरू वाघमोडे, पिंटू पवार, दिगंबर कावळे, गणेश चवरे, बालाजी कदम, राजाभाऊ पवार, अभिमान गायकवाड, संभाजी माळी, सिद्राम वाघमोडे, नागेश बारबोले, शुभम तळेकर, पृथ्वीराज भोसले, उमेश माने, अनिल वसेकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here