सोलापूर : भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये ३,७०,२३५ मेट्रिक टन ऊस गाळप केला. साखर उतारा ९.६० टक्के इतका नोंदविण्यात आला. याशिवाय, सहवीज निर्मिती विभागाने २.२० कोटी युनिट विजेची निर्यात केली. आता कारखान्याने हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिले अदा केली आहेत. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व ऊस बिले व वाहतूक तोडणीची बिले देण्यात आली असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने सांगण्यात आले. कंत्राटदारांची देयके एप्रिलमध्येच अदा करण्यात आली असल्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी सांगितले.
कारखाना प्रशासनाने सांगितले की, सहवीज प्रकल्पामुळे कारखान्याच्या आर्थिक स्थैर्याला आणि राज्याच्या वीज पुरवठ्याला हातभार लागला आहे. गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, नवा हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांची वचनपूर्ती करण्यात आली आहे. आता आगामी हंगामात तंत्रज्ञान आणि उपग्रह-आधारित प्रणालींचा वापर करून ऊस परिपक्वता आधारित तोडणी कार्यक्रम राबविण्याचे कारखान्याचे नियोजन आहे. यातून साखर उतारा वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे अधिक मूल्य मिळेल. या उपक्रमामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावरील उसाची अचूक माहिती कारखान्याकडे उपलब्ध राहील आणि लागवड दिनांक व उत्पादन याबाबत पारदर्शकता येणार आहे.


















