सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे लोकशक्ती शुगर अॅड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. दुपारी साडेचारच्या दरम्यान कारखाना परिसरात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे साखर गोडावूनचे छत उडून गेले. त्यामुळे गोडावूनमध्ये साठवून ठेवलेली साखर पावसाच्या पाण्यामुळे भिजून मोठे नुकसान झाले आहे.
कारखाना स्थळावरील साखरेच्या गोदामाचे छत उडाले. या छताचे पत्रे वादळामुळे उडून परिसरात पडले. अचानक वादळी वारे सुरू झाल्याने कोणतीही उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे गोदामात साठवलेली शेकडो पोती साखर भिजली. या नैसर्गिक आपत्तीत अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व शासकीय अधिकारी लवकरच कारखाना परिसराला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले.


















