सोलापूर : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने गेल्या दोन वर्षातील ऊस बिले थकवली आहेत. या रकमेसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने २५ मे २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुनम गेट येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनात धाराशिव, लातूर जिल्ह्यासह अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कार्यालयात आंदोलक शेतकरी, प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या रकमा देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी गुरुवारी बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले.
आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आ. कल्याणशेट्टी यांनी कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. सोमवारी त्यावर अंतिम निर्णय होईल. मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा होतील. अंतिम तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आहे असे त्यांनी शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. खरेदीदार बाबुराव बोत्रे-पाटील यांच्याशी यासंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. शेतकऱ्यांना सोमवार ते गुरुवार दरम्यान थकित रकमा बँक खात्यात जमा होतील असा विश्वास दिला. त्यानंत गोकुळ शुगर शेतकरी संघर्ष समितीचे अॅड. अमोल पाटील यांनी आ. कल्याणशेट्टी यांनी मध्यस्थी करुन शेतकऱ्यांना न्याय दिला. त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे घेत आहोत. न्याय मिळाला नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे असे सांगितले. भाजपा नेते शहाजी पवार, अरविंद घोडके, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे, जि प सदस्य नेताजी खंडागळे, बाळासाहेब मोरे आदींची उपस्थिती होती.


















