सोलापूर : आगामी गळीत हंगाम २०२६-२७ च्या यशस्वी नियोजनासाठी ओंकार शुगर कॉर्पोरेशन्स, युनिट क्रमांक ०६, म्हैसगाव येथे मिलरोलर पूजन समारंभ उत्साहात झाला. ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिलरोलर पूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी संचालक ओमराजे बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नवीन गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार शुगर ग्रुप नेहमीच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत असून आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि योग्य ऊसदर या त्रिसूत्रीच्या माध्यमातून उद्योगाची वाटचाल सुरू आहे. तसेच त्यांनी आगामी गळीत हंगामासाठी करण्यात आलेल्या यांत्रिक दुरुस्ती, देखभाल व इतर पूर्वतयारीची माहिती दिली. कारखान्यातील सर्व यंत्रसामग्रीची तपासणी पूर्ण झाली असून अधिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज राहील, असे नमूद केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.


















