सोलापूर : यंदाच्या २०२६-२७ ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी राज्यातील साखर कारखान्यांना खबरदारीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टिव्ह टेप असणे आवश्यक आहे. रिफ्लेक्टर नसल्यास संबंधित वाहनधारक व मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. गाळप हंगामात रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी, अंगद-जुगाड आणि ट्रकना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर अशा पद्धतीची उपाययोजना केली नसेल तर तातडीने अशी ऊस वाहतूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी ऊस गाळप हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात. रात्री रस्त्याच्या कडेला उभी असलेली किंवा संथगतीने जाणारी वाहने अनेकदा मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे धडक होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. यंदा ही शक्यता कमी करण्यासाठी साखर आयुक्तालयाने सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना निर्देश दिले आहेत. याचबरोबर वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरू नये, ट्रेलरला योग्य ब्रेक व आवश्यक सुरक्षा साधने असावीत, नोंदणी नसलेला ट्रेलर वापरू नये, चालकाकडे परवाना, विमा आदी आवश्यक कागदपत्रे असावीत, रात्री वाहन रस्त्यावर उभे करायचे असल्यास ते इतर वाहनांना स्पष्टपणे दिसेल, याची काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.


















