सोलापूर : भैरवनाथ शुगर वर्क्स लि., लवंगी येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या शुभारंभापूर्वी रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याची निरंतर प्रगती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची समृद्धी हा आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन अनिल सावंत यांच्या नेतृत्वामुळे कारखान्याने शेतकरी, कामगार, ग्रामीण भागाच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
आगामी गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त आयोजित रोलर पूजन सोहळ्याला जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, चीफ अकौंटंट देवानंद पासले, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, कृष्णदेव लोंढे, गजानन माने-देशमुख, शंकर पाटील, सुरक्षा अधिकारी कमळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते. यावेळी कारखान्यातर्फे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि तोडणी-वाहतूक ठेकेदारांचे आभार मानण्यात आले. शेतकरी, तोडणी-वाहतूक यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांच्या सहकार्यामुळेच कारखाना सातत्याने प्रगतीपथावर असल्याचे नमूद करण्यात आले.


















