सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्यावर्षी २.६१ लाख हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होते. त्यातून इतर जिल्ह्यांतील कारखान्यांकडे गेलेला ऊस वगळता जिल्ह्यातील कारखान्यांनी एक कोटी ६३ लाख ३७ हजार २१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. गत हंगामात प्रतिहेक्टरी सरासरी ६३ टन उत्पादन मिळाले होते. मात्र, आगामी गाळप हंगाम २०२६-२७ साठी २,२७,०५२ हेक्टर ऊसक्षेत्र उपलब्ध होण्याची शक्यता वृत्त दैनिक ‘सकाळ’ने दिले आहे.
‘सकाळ’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे कि, जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊसक्षेत्रात तब्बल ३४ हजार हेक्टरची घट झाली आहे. हे प्रमाण सुमारे १३ टक्के आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्याने उसाची वाढ खुंटली आहे. त्याचा परिणााम एकरी ऊस उत्पादन, साखर कारखान्यांच्या साखर उतारा, उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. परिणामी हंगाम साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक असेल. या पार्श्वभूमीवर उसाची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने यंदा प्रतिहेक्टरी सरासरी ७१ टन उत्पादन गृहीत धरले आहे. मात्र अडीच महिन्यांत गाळप आटोपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात आडसली ऊस क्षेत्र ४२ हजार ९११ हेक्टर आहे. तर पूर्वहंगामी ऊस ५४ हजार ०६४ हेक्टर असून सुरू ऊस ३१ हजार ९११ हेक्टर आहे. खोडवा ऊस ९८ हजार १६५ हेक्टरमध्ये असून एकूण २ लाख २७ हजार ०५२ हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध आहे. साखर आयुक्तालय व कृषी विभागाने जिल्ह्यासाठी २ लाख २७ हजार ०५२ हेक्टर ऊसक्षेत्र निश्चित केले असताना, कारखान्यांनी मात्र त्याच्या दुपटीहून अधिक म्हणजे ४ लाख ८१ हजार ८२४ हेक्टर उसाची नोंद दाखविली आहे. त्यामुळे निश्चित क्षेत्र आणि कारखान्यांच्या नोंदीतील मोठी तफावतही यंदाच्या हंगामात चर्चेचा विषय ठरणार आहे.
प्रत्यक्ष उपलब्ध ऊस, बाहेरील कारखान्यांकडे जाणारा ऊस आणि कारखान्यांच्या नोंदी यांचा ताळमेळ साधणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऊसक्षेत्रातील घट लक्षात घेता यंदा कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अधिक ऊसदर, वेळेवर ऊसबिले आणि गतवर्षीचा अनुभव या बाबींचा विचार करून शेतकरी ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, याचा निर्णय घेतील. त्यामुळे ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांना कार्यक्षेत्राबाहेरही स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. जिल्ह्यातील हंगाम ८० ते ९० दिवसांत संपू शकतो असे ऊस विशेषज्ज्ञ अंकुश चोरमले यांनी सांगितले.


















