सोलापूर : साखर आयुक्तालयाने ३१ जुलैअखेर जारी केलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३५ कारखान्यांनी मागील गळीत हंगामात एक कोटी ६३ लाख ३७ हजार २१० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यापोटी चार हजार ३४२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत. मात्र, केवळ १२ कारखान्यांनी जाहीर दरानुसार ऊसबिले दिली. दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, उर्वरित २३ कारखान्यांनी शेतकऱ्यांची ३५८ कोटी रुपयांची ऊसबिले अद्याप थकीत ठेवली आहेत. याशिवाय आणखी पाच कारखान्यांकडे ५६ कोटी रुपयांची एफआरपीही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पावसाअभावी खरीप हंगामाला फटका बसला आहे. अशात कारखान्यांनी पैसे थकवल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. हंगाम संपून पाच महिने आणि ऊस गाळप होऊन सात महिने उलटले, तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळालेले नाहीत. साखर आयुक्तांकडील माहितीनुसार, जिल्ह्यातील पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर व करकंब), लोकनेते, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), वृंदावन, आष्टी शुगर, सीताराम महाराज, विठ्ठल (वेणूनगर), लोकशक्ती या कारखान्यांनी १०० टक्के ऊस बिले दिली आहेत. आता आयुक्तालयाने आरआरसी कारवाई सुरू केल्याने कारखाने जाहीर केलेल्या दराऐवजी एफआरपी देण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, अंतिम दराकडे त्यांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.


















