सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहावी आणि भीमा नदीपात्रातील अनधिकृत पाणी उपसा रोखावा, यासाठी प्रशासनाने भीमा नदीच्या दोन्ही तीरांवरील कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद केला आहे. केवळ दोन तास वीजपुरवठ्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, याच काळात सीमेलगतच्या कर्नाटकातील भागात भीमा नदीतून शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू आहे.
शेजारच्या कर्नाटकात मोठ्या प्रमाणात नदीतून पाण्याचा उपसा सुरू आहे, मग भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी उपसा बंदी आणि केवळ दोन तास वीजपुरवठा का, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने कर्नाटकला पाणी बहाल केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी याप्रश्नी २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, भीमा नदीवरील बंधाऱ्यांत पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके जळू लागली आहेत. शुक्रवारी (ता. १९) विजय रणदिवे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज, कुरघोट परिसराला भेट देऊन पिकांची पाहणी केली. बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही विजेअभावी ते पिकांपर्यंत पोहोचत नसल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याचे चित्र त्यांनी पाहिल्यानंतर प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण व इंडी तालुक्यात शेतीसाठी सुमारे सात तास वीजपुरवठा केला जात असल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. चार तास सिंगल फेज वीजपुरवठाही उपलब्ध असून, तांत्रिक जुगाड करून पाण्याचा उपसा सुरू असल्याचे सांगितले. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीजपुरवठा दिला जात असल्याने संताप वाढला आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी कर्नाटकला आणि निर्बंध मात्र सोलापूरच्या शेतकऱ्यांना, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. नदीकाठच्या शेतीला किमान सहा तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.


















