सोलापूर : जिल्ह्यात पावसाअभावी उसाची वाढ खुंटली, चारा टंचाईमुळे वैरणीसाठी तोडणी सुरू

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षीचा खोडवा व नवीन लागवडीच्या नोंदी पाहता एकूण दोन लाख २७ हजार हेक्टर ऊस लागवड क्षेत्र कागदावर दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात क्षेत्र कमी असेल असे अनुमान वर्तवण्यात येत आहे. सध्या पाऊस नसल्याने पाण्याअभावी पशुधनासाठी चारा उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे जिल्हाभरात उसाची तोडणी वैरणीसाठी सुरू आहे. याचा फटका आगामी गळीत हंगामात बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातून सर्वाधिक ४० साखर कारखाने असलेल्या जिल्ह्यात आगामी ऊस गळीत हंगाम अडचणीचा ठरणार आहे. पावसाअभावी उसाची वाढ झालेली नाही. वैरणीसाठी सुरू झालेली तोडणी ही साखर कारखानदारांच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे.

ऐन पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. जून व जुलै महिन्यात थोडाफार पडून आशा लावलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे गायब झाला आहे. यापूर्वी २०१७, २०१८ व २०१९ मध्ये असाच जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडला होता. त्यानंतर २०२५ पर्यंत जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांपैकी एखाद्या महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला, मात्र इतर दोन महिन्यांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. यंदा तशा स्थितीची अपेक्षा शेतकऱ्यांसह कारखानदारांनाही आहे. याबाबत बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रोचे चेअरमन महेश देशमुख यांच्या मते गाळपासाठी नोंदणी झालेले ऊस क्षेत्र पुरेसे असले तरी पाऊस नसल्याचा उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला आहे. एखाद-दुसरा फड सोडला तर सर्रास १०-१२ कांड्यावर ऊस आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडला तर डिसेंबरपर्यंत किमान तोडणीला ऊस येईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here