सोलापूर : सिद्धनाथ शुगरने उर्वरीत ऊसबिल न दिल्यास ठिय्या आंदोलनाचा स्वाभिमानी संघटनेचा इशारा

सोलापूर : सिद्धनाथ शुगरचा २०२५-२६चा ऊस गाळप हंगाम संपून तब्बल आठ महिने उलटले आहेत. तरीही काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले कारखान्याने दिलेली नाहीत. बैलपोळा आणि आगामी सण-उत्सव तोंडावर असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे १० सप्टेंबरपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे थकीत ऊस बिलांची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. लवकरात लवकर ऊस बिले न दिल्यास १० सप्टेंबरपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. अध्यक्ष रणदिवे म्हणाले की, जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. हंगाम सुरू होताना एक दर जाहीर केला जातो; मात्र शेतकऱ्यांना देताना दुसऱ्या दराने रक्कम दिली जाते. सिद्धनाथ कारखान्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असून, उर्वरित बिल तत्काळ न दिल्यास संघटनेकडून उग्र आंदोलन केले जाईल. ऊस बिले मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, दीपक हजारे, अमोल पवार, युवराज भडकुंबे, मोहसीन पटेल, काकासाहेब पाटील, अजिनाथ पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here