सोलापूर: सध्या साखरेचे दर वाढले असून इथेनॉल व अन्य उत्पादनांतूनही कारखान्यांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान २०० ते ३०० रुपयांचा दुसरा हप्ता देणे शक्य आहे. कारखानदारांनी तातडीने निर्णय घ्यावा. कारखान्यांनी एफआरपीव्यतिरिक्त दसरा-दिवाळीपूर्वी २०० ते ३०० रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका शाखेने केली आहे. साखरेचा दर ३८ रुपयांवरून ६० रुपयांपर्यंत पोचला आहे. या दरवाढीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा संघटनेने केली आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांनी सांगितले की, जूनपासून पावसाने ओढ दिल्याने ऊस पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या दुबार पिकाच्या अपेक्षा मावळल्या असून, नवीन ऊस लागवडीसाठीही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. खते, बियाणे, मजुरी, वाहतूक व मशागतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. सध्या साखरेच्या दराबरोबरच इथेनॉल व अन्य उपपदार्थांच्या उत्पन्नातही वाढ होत असल्याने कारखान्यांनी त्याचा लाभ ऊस उत्पादकांना द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. शेतकरी भानुदास सालगुडे पाटील म्हणाले की, साखरेचे दर ३८०० रुपयांवरून ६००० रुपयांपर्यंत पोचले आहेत. या तेजीचा फायदा कारखानदार व व्यापाऱ्यांना होत असताना शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. सणासुदीपूर्वी २०० ते ३०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा. सरकारनेही हस्तक्षेप करून कारखानदारांवर दबाव आणावा.


















