सोलापूर : जिल्ह्यातील २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामाला तब्बल आठ महिने उलटले आहेत. तरीही तिन्हे येथील सिद्धनाथ शुगरने काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले कारखान्याने दिलेली नाहीत. बैलपोळा आणि आगामी सण-उत्सव तोंडावर असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे १० सप्टेंबरपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे थकीत ऊस बिलांची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. याप्रश्नी गुरुवारपासून (दि. १०) कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हंगामाच्या सुरुवातीला सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २२३७ रुपये इतकेच बिल अदा करण्यात आले आहे, तर काहींना अद्याप कोणतीही रक्कम मिळालेली नाही. सिद्धनाथ शुगरने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत ऊसबिले तत्काळ खात्यावर जमा करावीत. मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारपासून कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, दीपक हजारे, अमोल पवार, युवराज भडकुंबे, मोहसीन पटेल, काकासाहेब पाटील, अजिनाथ पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


















