सोलापूर : यंदाचा ऊस गाळप हंगाम संकटात, जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसल्याने उसाची वाढ खुंटली

सोलापूर : मागील वर्षी चांगल्या पावसाच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाली; मात्र यंदाच्या पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटण्याबरोबरच उपलब्ध पाण्यावर ऊस वाचविण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.दरम्यान, २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी केंद्र सरकारने १०.२५ टक्के साखर उतारा गृहीत धरून उसाला प्रतिक्विंटल ३६५ रुपये एफआरपी मंजूर केली आहे. हा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. परंतू एफआरपी जाहीर झाली असली तरी उसाचे उत्पादनच घटले तर त्याचा थेट परिणाम शेतकरी आणि साखर कारखान्यांवर होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हवामानात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी आणि उष्णता वाढली आहे. ऊस पिकाच्या वाढीच्या काळात पाण्याचा ताण निर्माण झाल्याने उसाची उंची, जाडी आणि वजनावर परिणाम झाला असून, पुढे साखर उताऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. यातील जवळपास ७० टक्के क्षेत्र खोडव्याचे आहे. ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे ही चिंता आणखी वाढली आहे. विशेषतः माळशिरस, मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूरच्या काही भागांत पाण्याची उपलब्धता उसासाठी निर्णायक ठरणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here