सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे दराची स्पर्धा निर्माण होवून परिसरातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळत आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामामध्ये आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यास गळीतास पाठवावा. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये विठ्ठल कारखान्यामार्फत इतर कारखान्यास गळीतास गेलेल्या उसाला ३००१ रुपयांप्रमाणे ऊस पुरवठादार शेतकरी यांना रु. ३१९ कोटीची सर्व बिले अदा केलेली आहेत. आता रोलर पूजन करण्यात आले. रोलर पूजन हा हंगामाचा वेग वाढविणारा पहिला कार्यक्रम असतो. मशिनरी दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करुन सर्व अडचणी सोडवून कारखाना पूर्ण क्षमतेने यशस्वीपणे चालावा, याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व आमदार अभिजित पाटील यांनी केले.
आगामी गळीत हंगाम २०२६-२७ साठी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प. नवनाथ महाराज मोरे यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आ. अभिजीत पाटील म्हणाले की, कारखान्याचे जास्तीत गाळप केल्यास आपल्याला कोणत्याही अड़चणी येणार नाहीत. पंजाब व इतर राज्यांनी एफआरपी अदा करणेसाठी प्रतीटन ५०० रुपये अनुदान दिलेले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनानेही ६०० रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आम्ही केलेली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, कालिदास साळुंखे, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, नवनाथ नाईकनवरे, सचिन वाघाटे, सिध्देश्वर बंडगर, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड उपस्थित होते.


















