राज्यातील साखर कारखान्यांकडे 4,898 कोटी एफआरपी थकीत; शेतकरी आर्थिक अडचणीत

पुणे: यंदाचा 2025-26 चा ऊस गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात असून सध्या केवळ 10 ते 12 कारखाने सुरु आहेत. गाळप हंगाम संपला असला तरी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे 4 हजार 898 कोटी रुपये थकीत ठेवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळेवर परतफेड करण्याची बँकांची 31 मार्च ही अखेरची तारीख आहे. कारखान्यांनी संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहण्याची दाट शक्यता आहे. उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचा (एफआरपी) फेब्रवारी महिनाअखेर देय रक्कमेचा ऊस तोडणी वाहतूक खर्चासह आकडा 37 हजार 662 रुपये होता. त्यापैकी साखर कारखान्यांकडे सध्या 4 हजार 898 रुपये थकीत आहेत. खरीप हंगाम 2025 साठी शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून एप्रिल महिन्यात घेतलेल्या पीक कर्जाची रक्कम ही मार्च 2026 अखेर जमा करणे गरजेचे आहे.

वेळेत पीक कर्ज परतफेड केल्यास शेतकऱ्यांना ही रक्कम शून्य टक्‍के व्याज दराने शासन योजनेनुसार बँकांकडून उपलब्ध करुन दिली जाते. जर ही थकीत राहिल्यास कर्जावर 12 टक्‍के व्याजाची आकारणी केली जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चूक नसताना एफआरपीची रक्कमच कारखान्यांनी वेळेवर न दिल्याने कर्ज थकीत होऊन त्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी यामध्ये कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

थकीत एफआरपीप्रश्नी संबंधित कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या असून 31 मार्चअखेरचा थकीतचा आकडा कमी होणे अपेक्षित आहे. कारखान्यांनी सुनावण्यांमध्ये रक्कम देण्याचे कबूल केले होते. एफआरपीची रक्कम वेळेत देण्याचे कारखान्यांवर बंधनकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर मागील आठवड्यात संयुक्त बैठक झालेली आहे. पुढील आठवड्यात थकीत एफआरपीचा पुन्हा आढावा घेऊन संबंधितांच्या सुनावण्या होतील व पुढील कारवाईची भुमिका ठरवू, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here