मुंबई (महाराष्ट्र): ऊस गाळप हंगामात अनेकदा मुकादम (ठेकेदार) ऊस वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांकडून ॲडव्हान्स रक्कम घेऊन ती ऊसतोड कामगारांपर्यंत न पोहोचवता पसार होतात. त्यामुळे उसतोड मजूर आणि साखर कारखान्यांची फसवणूक होते. ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्यानुसार फसवणूक करणाऱ्यांना एक वर्षापर्यंत कारावास आणि ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असेल. ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सहकार विभागाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडून अध्यादेश काढण्याची शक्यता आहे.
उसतोड मजूर , शेतकरी आणि साखर कारखान्यांची कोट्यवधींची फसवणूक…
राज्यात ऊसतोडीशी संबंधित मुकादमांकडून अनेक वर्षांपासून उसतोड मजूर, शेतकरी आणि साखर कारखान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. उचल रक्कम घेऊनही मजूर न पाठवणे किंवा तोडणीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश येथून मजूर आणण्यासाठी मुकादम लाखो रुपये घेतात; मात्र हंगामात मजूर पाठवत नाहीत. काही ठिकाणी तर कामगारांना पैसे न देता मुकादम पसार होतात. या टोळ्यांमुळे शेतकरी, कारखानदार आणि मजूर सर्वजण आर्थिक अडचणीत सापडतात. त्यामुळे मुकादमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची घोषणा यापूर्वीच उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांनी केली होती.
आर्थिक व्यवहारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र कायदा…
त्यांच्या निर्देशानुसार सहकार विभागाने साखर कारखाने, वाहतूकदार, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातील आर्थिक व्यवहारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मंजूर करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र मंत्रिमंडळाने काही सुधारणा सुचवून सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली आहे.
प्रस्तावित कायद्यानुसार कामगार, वाहतूकदार आणि मुकादम यांच्या नोंदणीसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असून मुकादम आणि कामगारांची नोंदणी बंधनकारक असेल. यासाठी सरकार एक पोर्टल विकसित करणार असून सर्व करार त्यावर अपलोड करणे आवश्यक असेल. सर्व देयके बँकेमार्फत वेळेवर केली जातील आणि कामगारांना रोख ऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देणे अनिवार्य असेल. वाद उद्भवल्यास त्याच्या निवारणासाठी आणि अपीलसाठी विशेष कायदेशीर तरतूद केली जाईल तसेच मुकादम म्हणून नोंदणी करण्याच्या अटी अधिक कडक करण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविल्या सुधारणा …
कायदा किंवा कराराचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखानदार, वाहतूकदार किंवा मुकादम यांना पहिल्यांदा २५ ते ५० हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा ५० ते ७५ हजार रुपये किंवा करार रकमेच्या दुप्पट (जे अधिक असेल) इतका दंड आकारला जाईल। तसेच फसवणूक किंवा चुकीची माहिती दिल्यास एक वर्षापर्यंत कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड प्रस्तावित आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याच्या काही तरतुदींमध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या असून त्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली आहे। या उपसमितीत जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पर्यावरण, पर्यटन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री समाविष्ट आहेत.


















