पुणे : राज्यातील गाळप हंगाम २०२५-२६ संपल्यानंतरही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) पूर्णपणे अदा केलेली नाही. थकीत रक्कम भरण्यासाठी साखर कारखान्यांना वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. साखर आयुक्तालयाने ३० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चासह एफआरपीची एकूण देय रक्कम ४० हजार ३३९ कोटी रुपये इतकी होती. त्यापैकी साखर कारखान्यांनी सुमारे ३९ हजार ३६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. मात्र अजूनही १३०३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत असून ही रक्कम ९६ साखर कारखान्यांकडून येणे बाकी आहे. दरम्यान, ११३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा केल्याची माहिती समोर आली आहे.
थकीत एफआरपीच्या मुद्द्यावर सोमवारी (११ मे) साखर आयुक्तालयात ३९ साखर कारखान्यांची सुनावणी घेण्यात आली. नोटीस बजावल्यानंतर सुनावणीपर्यंत १५ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपीची रक्कम अदा केल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित कारखान्यांनी थकीत रक्कम भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने कमी थकबाकी असलेल्या कारखान्यांना १८ मेपर्यंत, तर अधिक थकीत रक्कम असलेल्या कारखान्यांना २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सुनावणीदरम्यान स्पष्ट इशारा दिला की, सुनावणीत दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित कारखान्यांनी मुदतीत एफआरपीची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येईल.


















