सातारा : यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची सूचना केंद्र शासनाने केली आहे. राज्य शासनाने १५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरू करण्याची सूचना साखर कारखान्यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर काही कारखान्यांनी एक ऑक्टोबरपासूनच कारखाने सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार बॉयलर प्रदीपन करण्याचे नियोजन केले आहे. सातारा जिल्ह्यातील १७ साखर कारखाने यावर्षीही गाळप करणार आहेत. याआधीच मजुरांशी करार पूर्ण झाले आहेत. त्या तुलनेत उसाची उपलब्धता मोठी आहे. पाणी टंचाईचे संकट आणि ऊस वेळेत जाण्यासाठी हा निर्णय योग्य असला तरी साखर उताऱ्यास या निर्णयाचा फटका बसणार आहे. हंगाम लवकर सुरू होण्यामुळे सरासरी साखर उताऱ्यात घट होऊन ऊस बिलावर त्याचा विपरित परिणाम होण्याचा अंदाजही व्यक्त होत आहे.
याच मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हंगाम लवकर सुरू करण्यास विरोध केला आहे. संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदाचा ऊसदर ठरविण्यासाठी उद्या (बुधवार) सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत मागील हंगामाचे शिल्लक तीनशे रुपये मिळावे, साखर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा तसेच नोव्हेंबरनंतर थंडी सुरू होऊन पेरात साखर उतरण्यास सुरुवात होऊन उसाचे वजन वाढते, अशा मागण्यांवर चर्चा होणार आहे. लवकर कारखाने सुरू झाल्यास शेतकऱ्यांना वजनात सहन कराव्या लागणाऱ्या घटीच्या मुद्द्यांवरून संघटना कारखानदारांशी संघर्ष करेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी सांगितले. दरम्यान, सध्या काही तालुक्यात पावसाने मारलेली दडी आणि वीज वितरण कंपनीने शेती पंपाच्या कनेक्शनसाठी अघोषितपणे चालवलेल्या भारनियमनामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर उसाच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साखरेचा वाढलेला दर लक्षात घेता शेतकऱ्यांना वाढीव बिलाची अपेक्षा आहे. सरासरी तीनशे रुपयांपर्यंत वाढीव बिलाची मागणी घेऊन शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


















