कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या 19 आणि 20 जून रोजी होणाऱ्या दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्याकडे देशातील साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात साखर क्षेत्राशी संबंधित अनेक प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेत साखर उद्योगासमोरील विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आता कोल्हापूर दौऱ्यादरम्यान उद्योगाला दिलासा देणारे काही महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साखर उद्योग करतोय आर्थिक संकटाचा सामना…
देशभरातील साखर कारखाने आगामी गळीत हंगामाच्या तयारीत व्यस्त असले तरी वाढता उत्पादन खर्च आणि तुलनेने कमी विक्री दर यामुळे उद्योगावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. उद्योग प्रतिनिधींच्या मते, उसाचा खर्च सातत्याने वाढत असताना साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) अपेक्षित वाढ झालेली नाही. सध्या साखरेचा किमान विक्री दर 31 रुपये प्रति किलो असून तो वाढवून 41 ते 43 रुपये प्रति किलो करण्याची मागणी करण्यात येत आहे. उद्योगाच्या मते, एफआरपी आणि ‘एमएसपी’मधील वाढते असंतुलन साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम करत आहे.
एमएसपीमध्ये वाढ करणे ही काळाची गरज…
साखर उद्योगाचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारातून साखरेला मिळणारा दर पुरेसा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा एमएसपी 3,100 रुपये प्रति क्विंटलवरून किमान 4,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवावी.उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एमएसपी वाढल्यास कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणे साखर कारखान्यांना देणे शक्य होईल.
अडचणीतील कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनालाही प्राधान्य….
एमएसपी वाढीसोबतच साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या पुनर्गठनाची मागणीही जोर धरत आहे. उद्योगाचे सूत्रांच्या मते, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत कर्ज पुनर्गठनामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल आणि ते आगामी गळीत हंगामासाठी अधिक सक्षमपणे तयारी करू शकतील. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांचा साखर उद्योगाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यादरम्यान उद्योगाशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारकडून दिलासादायक निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
साखर उद्योगाच्या काही महत्त्वाच्या मागण्या…
साखर उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सप्टेंबर 2025 पर्यंत साखर उत्पादनाचा खर्च 4,029 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यापैकी केवळ उसाच्या एफआरपीचा खर्च 3,463 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. याशिवाय रसायने, इंधन आणि इतर उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगाने केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये साखरेच्या किमान विक्री दरात वाढ, इथेनॉलला अधिक चांगला दर, 31 मार्च 2026 पर्यंतच्या थकीत कर्जांचे पुनर्गठन, दोन वर्षांची स्थगिती (मोरॅटोरियम) आणि 10 ते 12 वर्षांची परतफेड मुदत यांचा समावेश आहे.तसेच इथेनॉल प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज अनुदानापोटी 21 साखर कारखान्यांचे सुमारे 69 कोटी रुपये अद्याप प्रलंबित असल्याचेही उद्योगाकडून सांगण्यात आले आहे.
साखर उद्योगासमोरील अडचणी मंत्री शाह यांच्यासमोर मांडणार : मंत्री मुश्रीफ
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले कि, साखर उद्योगासमोरील विविध प्रश्न मंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. साखर उद्योगासमोरील आव्हानांबाबत अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे.साखर निर्यात धोरण अधिक अनुकूल करणे, इथेनॉल उत्पादनातील गुंतवणूक वाढवणे, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवणे, साखरेचा किमान विक्री दर (MSP) आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रास्त व लाभदायक दर (FRP) संदर्भातील समस्यांकडे शाह यांचे लक्ष वेधले जाणार आहे.


















