साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या विकासाचा प्रमुख स्त्रोत :‘व्हीएसआय’ उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील

पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योग हा शेतकरी कामगार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि राज्य सरकार यांच्यातील यशस्वी भागीदारीचे उत्तम उदाहरण आहे. या उद्योगाने लाखो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न ग्रामीण भागात रोजगार आणि सरकारला महसूल मिळवून दिला आहे. आज घडीला ५० लाख शेतकरी, दहा लाख ऊसतोडणी कामगार आणि दीड लाख कर्मचारी या उद्योगाशी जोडलेले आहेत. त्यातून ५५ ते ६० हजार कोटींची उलाढाल आणि आठ हजार कोटी रुपयांचा महसूल राज्यात निर्माण होतो, असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखात व्यक्त केले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत साखर कारखान्यांचे योगदान मोठे…

ChiniMandi WhatsApp Channel

लेखात वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या अनेक दशकांत ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत साखर कारखान्यांचे योगदान मोठे आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाहतूक, शेती मार्गदर्शन, सिंचन व्यवस्थापन, आधुनिक शेती पद्धतीचा लाभ दिला आहे. त्यामुळे राज्यातील ऊस पट्ट्यात आर्थिक स्थैर्य दिसून येते. नेहमीच उत्पन्न आणि उसाचे निश्चित मूल्य यामुळे शेतकऱ्यांच्या जोखमीत घट होते. दहा लाख ऊस तोडणी कामगारांना या उद्योगामुळे हंगामी रोजगार मिळतो.

साखर कारखान्यांच्या माध्यमातून सामाजिक सुविधा विकसित…

वळसे-पाटील यांच्या मते, अनेक साखर कारखान्यांच्या माध्यमातून रस्ते, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये अशा सामाजिक सुविधा विकसित झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात स्थलांतर कमी होण्यास या उद्योगाने मोठा हातभार मिळवला आहे. साखर उद्योग मजबूत राहिल्यास राज्य सरकारलाही अधिक महसूल मिळतो. गेल्या काही वर्षात इथेनॉल उत्पादनामुळे साखर उद्योगाला नवे बळ मिळाले आहे. महाराष्ट्र दरवर्षी ४२४ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन निर्माण करू शकतो. हे उत्पादन देशाचे परकीय चलन वाचवते. इथेनॉल उत्पादनामुळे उसाचा अधिक परिणामकारक वापर होत असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

साखरेचा दर ४१ रुपये क्विंटल करण्याची मागणी…

ते म्हणाले की, महाराष्ट्राला एकूण ४२४ कोटी लिटर क्षमतेपैकी १६६ कोटी लिटरचे वाटप झाले आहे. सध्या सुमारे २६ टक्के क्षमता वापरली जात आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत साखरेचा दर ४१ रुपये क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय इथेनॉलसाठी ७२ रुपये लिटर आणि बी हेवी मोलॅसिस आधारित इथेनॉलसाठी ६७ रुपये दर निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऊस हे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह नगदी पीक…

ऊस हे महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह नगदी पीक मानले जाते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील चढ-उतारांच्या तुलनेने कमी फटका बसतो. कारण केंद्र सरकारकडून एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस) निश्चित केली जाते. २०१८-१९ मध्ये उसाची एफआरपी २,७५० रु. प्रति टन होती. ती वाढून २०२६-२७ मध्ये ३,६५० रु. प्रति टन झाली आहे. म्हणजे आठ वर्षात सुमारे ३३ टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेत चलनवाढ झाली आहे.

केंद्र आणि राज्य शासन उद्योगाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्नशील…

साखरेच्या उत्पादनाचा खर्च वाढला असला तरी केंद्र आणि राज्य शासन या उद्योगाच्या बळकटीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. उपलब्ध माहितीनुसार ११ सप्टेंबर २०२५च्या पत्रानुसार साखरेचा उत्पादन खर्च ४,०२९ रु. प्रति क्विटल आहे. यामध्ये ऊस एफआरपीचा खर्च ३,४६३ रु. प्रति क्विटल आहे. प्रक्रियेदरम्यान लागणारी रसायने, इंधन आणि इतर खर्चातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगाने काही मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये साखरेचा किमान आधारभूत दर ४,१०० रु. प्रति क्विटल करण्याची मागणी, रस/सिरप आधारित इथेनॉलसाठी ७२. रु. प्रति लिटर आणि बी-हेवी मोर्लेसेस आधारित इथेनॉलसाठी ६७ रु. प्रति लिटर दर निश्चित करण्याची मागणी समाविष्ट आहे. तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकीत कर्जे पुनर्गठित करून दोन वर्षांचा स्थगिती कालावधी आणि १०-१२ वर्षांचा परतफेड कालावधी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याशिवाय इथेनॉल प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज अनुदानापोटी २१ कारखान्यांचे ६९ कोटी रुपये प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here