साखर कारखान्यांकडून ‘एफआरपी’ दूरच; ३५०० रुपये ऊसदराचाही ठेंगाच : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

सांगली : जिल्हाधिकाऱ्यांच्या, साखर कारखानदारांच्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रतिटन तीन हजार ५०० रुपयांचा ऊसदर देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र, अनेक साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. पेरणी आणि बी-बियाणांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने ऊस बिल थकले असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे थकीत एफआरपीसह ठरलेला ऊसदर शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची थकीत रक्कम तातडीने वर्ग करावी, अशी मागणी संदीप राजोबा यांनी केली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसासाठी दर देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

या बैठकीत ज्या साखर कारखान्याची एफआरपी प्रतिटन तीन हजार ४०० रुपयांपेक्षा अधिक आहे, त्या कारखान्याने एफआरपी अधिक १०० रुपये, तर ज्यांची एफआरपी तीन हजार ४०० रुपयांच्या आत आहे, त्यांनी तीन हजार ५०० रुपये ऊसदर देण्याचे कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे तीन हजार ५०० रुपये ऊसदर देणे तर दूरच; अनेक शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीची रक्कमही अदा केलेली नाही, असा आरोप राजोबा यांनी केला.

शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे तीन हजार ५०० रुपये ऊसदर मिळणे अपेक्षित आहे. अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कमही दिलेली नाही. ठरलेला ऊसदर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संदीप राजोबा यांनी दिला आहे. एफआरपीची रक्कम वेळेत न दिल्यास ऊस बिलावर १५ टक्के व्याजाची आकारणी करून ती रक्कम शेतकऱ्यांना मिळावी पाहिजे, अशी मागणी संदीप राजोबा यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी कारखानदार आणि संबंधित विभागाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी रावसाहेब अवधान, विनोद पाटील, तानाजी पाटील, दत्ता बाबर, मनोहर पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here