नवी दिल्ली : गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ३० एप्रिलपर्यंत एकूण साखर उत्पादन २.७५ कोटी टनांवर पोहोचले आहे. साखर उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटकने उत्पादनात आघाडी घेतली आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र किंचित घट झाली. महाराष्ट्रात उत्पादनात मोठी वाढ होऊन ते ९९.२ लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी ८०.९ लाख टन उत्पादन झाले होते. साखर हंगामात उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येत असली तरी साखर कारखान्यांची आर्थिक कोंडीही वाढली आहे. यात धोरणात्मक बदलांची गरज असल्याचे ‘भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघाने म्हटले आहे.
उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी साखरेच्या किमान विक्री मूल्यात तातडीने वाढ करावी, एथेनॉलच्या खरेदी दरात वेळेवर सुधारणा करावी आणि इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ए२० वरून वाढवून ए २५ आणि ए ८५ पर्यंत नेण्याचे आवाहन अशी मागणी इस्माने केली आहे, याशिवाय, साखर उद्योगाशी संबंधित जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण करावे अशी मागणीही जोर धरत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उत्पादन घसरले असून ते गेल्या वर्षातल्या ९२.४ लाख टनांवरून ८९.६ लाख टनांवर आले आहे. सध्या देशातील गाळप हंगाम जवळपास संपत आला असून केवळ ५ कारखाने सुरू आहेत.
कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जून-जुलै दरम्यान विशेष हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये साखर उत्पादन ४०.४ लाख टनांवरून ४८ लाख टनांवर गेले आहे. साखरेचे उत्पादन वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्न गंभीर होत आहे. महाराष्ट्रात एप्रिलच्या मध्यापर्यंत ऊस उत्पादकांची देणी २,१३० कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. गेल्यावर्षीच्या समान कालावधीत ७५२ कोटी रुपयांची देणी थकीत होती.


















