पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर देणारा अग्रगण्य म्हणून ओळखला जाणारा ओंकार साखर कारखाना उद्योगसमूह सध्या १७ साखर कारखाने यशस्वीपणे चालवत असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातही आपली मजबूत उपस्थिती राखत आहे. चालू गळीत हंगामात सुमारे ७५ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, हंगामअखेर १ कोटी टन गाळपाचे उद्दिष्ट उद्योग समूहाने ठेवले आहे. या उद्योगसमूहाशी सुमारे ८ लाख शेतकरी, १८ हजार कामगार, २.९५ लाख मजूर व चालक जोडले गेले असून, वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि ट्रकचा वापर केला जात आहे.
अनेक वर्षे बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करून काटेकोर नियोजन व सक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर समूहाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांना वेळेत देयके देण्यावर विशेष भर दिला जात आहे. अफवा पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले असून, नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी केले आहे.
एक रुपयाही थकीत राहणार नाही : बाबूराव बोत्रे-पाटील
बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले, बंद पडलेले कारखाने आर्थिक शिस्त आणि योग्य व्यवस्थापनामुळे सुरू करून आम्ही शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयामुळे यंदा इथेनॉल आणि मोलेसिसची विक्री अद्याप झालेली नाही. यापोटी उद्योग समूहाला ६०० कोटी रुपये येणे बाकी असल्याने पेमेंटला एक महिना उशीर झाला आहे. मात्र, आता ही प्रक्रिया मार्गी लागली असून शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्यात जिथे जिथे ओंकार ग्रुप कारखाने चालवत आहे, तिथे उसाचे वेळेत गाळप आणि योग्य दर देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कामगारांची पगारवाढही करण्यात आली असून सर्व घटक समाधानी आहेत. पुढील गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.


















