कोल्हापूर : देशात चालू हंगामात ३२४ लाख मेट्रिक टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापैकी सुमारे ३४ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल आणि निव्वळ साखरेचे उत्पादन २९० लाख मेट्रिक टनांवर स्थिर होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, यंदा साखरेच्या उताऱ्यामध्ये घट झाली आणि एप्रिलअखेर उत्पादन २७५ लाख मेट्रिक टनांवर आले. त्यामुळे संभाव्य महागाईला रोखण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर कडक निर्बंध आणले आहेत. या निर्णयामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेली भारतीय साखर कारखानदारीची कोंडी झाली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर देशातील साखर कारखानदारीचा डोलारा कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने साखरेचा निर्यात दर्जा निषिद्ध केला आहे. साखर निर्यातबंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगातील अस्वस्थता वाढली आहे. देशातील हंगामातील साखर उत्पादन २८० लाख मेट्रिक टनांपुढे जात नाही, असे चित्र आहे. सुरुवातीला केंद्र सरकारने १० लाख मे. टन साखर निर्यातीला परवानगी दिली. त्यानंतर मध्यंतरी ५ लाख मे. टन कोटा वाढवण्यात आला. मात्र १० लाख मे. टन साखर निर्यातीच्या प्रतीक्षेत आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने साखर व इथेनॉलच्य किमान हमीभावात वाढ करण्याची गरज आहे. साखरेची एमएसपी वाढावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून साखर उद्योगाकडून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखरेच्या एमएसपी वाढीसाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन झाली. मात्र, अद्याप फारसे काही झालेले नाही.


















