सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ च्या ऊस तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या हस्ते झाला. नायकवडी म्हणाले, शेती विभागाने काळजी घ्यावी. कंत्राटदारांनी एकमेकांशी प्रामाणिक व सहकार्यान राहावे. भरपूर व्यवसाय करावा. मजुरांना रक्कम वाटताना फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.
नायकवडी पुढे म्हणाले, ऊस उत्पादक, ऊस तोडणी-वाहतूक करणारे कंत्राटदार व कामगार हे तीन महत्त्वाचे घटक असताना हे चांगले चालले, तरच कारखाना चांगला चालतो. ऊस तोडणी-वाहतूकदारांनी चांगला व्यवसाय करून कामकाजात मदत करावी. शेती विभागाने ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक अरविंद कदम, तुकाराम डवंग, विश्वास थोरात, शिवाजी खामकर, शरद थोरात, संभाजीराव पाटील, विशाखा कदम, जयश्री अहिर, अजित वाजे, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, सचिव मुकेश पवार, शेतकी अधिकारी सर्जेराव वावरे, अधिकारी गोपाळ आरखडे, एन. डी. पाटील, संजय गायकवाड, कर्मचारी, ऊस तोडणी, कंत्राटदार उपस्थित होते.


















