कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले; ५ हजार रुपये दरासाठी ‘छावणी’ आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर : उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या ऊसदर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात वाढली असून, अनेक ठिकाणी साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. काही ठिकाणी ऊस वाहतुकीच्या वाहनांची तोडफोड आणि ट्रॅक्टर उलटविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, ऊसदर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

वाठार येथे ऊस वाहतूक रोखली; ‘छावणी’ आंदोलन सुरू

ChiniMandi WhatsApp Channel

हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक करणारी वाहने पुढे जाऊ देणार नाही, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. संघटनेतर्फे वाठार येथे ‘छावणी’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वाठार-वारणानगर राज्य मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून वारणानगरच्या दिशेने जाणारी ऊस वाहतूक रोखली. रात्री वडगाव पोलिसांनी वाहने सोडण्याची विनंती केली; मात्र कार्यकर्त्यांनी ती मान्य केली नाही. रात्री दहाच्या सुमारास राजू शेट्टी आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी शेट्टी म्हणाले, “ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्याशिवाय छावणी आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”वाहनांच्या नियमबद्ध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, वाहनचालक आणि मालकांवर अन्याय झाला, तेव्हा स्वाभिमानी संघटना त्यांच्या मदतीला धावून आली होती. आता शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनात वाहनचालकांनीही सहकार्य करावे.

कारखानदारांकडून आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, तालुकाध्यक्ष सुधीर मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष अप्पा एडके, सरचिटणीस संपतराव पोवार, सुरेश शिर्के, सुरेश पाटील, हरिभाऊ जाधव, भीमराव मगदूम, उमेश पाटील सूर्यवंशी, पंकज पाटील, सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

राजाराम कारखाना परिसरात तणाव; ट्रॅक्टरचालकाला मारहाण

राजाराम साखर कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या ऊसदर आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला. ऊस वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नातून शेतकरी आणि वाहतूकदार यांच्यात वाद झाल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या रिकाम्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरने एका व्यक्तीला धडक दिल्याने वादाला सुरुवात झाली. संबंधित ट्रॅक्टरचालकाने शेतकऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सौरभ शेट्टी यांनी केला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित वाहतूकदाराला अडवून चालकाला मारहाण केली. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून चालकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले आणि ताब्यात घेतले.दरम्यान, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत वाहतूक रोखण्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे.

छत्रपती शाहू साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली

ऊसदर जाहीर होण्यापूर्वीच ऊसतोड आणि वाहतूक सुरू केल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी छत्रपती शाहू साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहने अडविली. ऊसदर जाहीर होईपर्यंत ऊसतोड आणि वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी करत ऊस भरून निघालेली वाहने पुन्हा शेतात पाठविण्यात आली.छत्रपती शाहू साखर कारखान्याकडून ऊसतोड आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी आक्रमक झाले. मुख्य बसस्थानक परिसरात युवक, कार्यकर्ते आणि शेतकरी एकत्र आले. त्यांनी कारखान्याकडे जाणारी ऊस वाहने रोखून परत पाठविली. यावेळी कारखाना कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.शासन आणि साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर करेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ऊसतोड करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनेचे राजगोंडा पाटील यांनी केले.

ऊसदर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात ऊसदराचा प्रश्न अधिक तीव्र होत असून, विविध ठिकाणी ऊस वाहतूक रोखण्याच्या घटना घडत आहेत. उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर देण्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात ऊसदराच्या प्रश्नावर सरकार आणि साखर कारखानदार काय निर्णय घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here