कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे आर्थिक ताण वाढला आहे. रासायनिक खतांचे दर सुमारे २५०० ते २७०० रुपयेपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे, दुसरीकडे राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक आहे. साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल ५००० ते ५३०० रुपयेपेक्षा अधिक आहे.
किरकोळ बाजारात साखर ६५ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. तसेच बी-हेवी मोलॅसिसचा दर ६७ रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिस ५५ रुपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर ६३ रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार न केल्यास साखर कारखान्यातील साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी स्वाभिमानी संघटनेचे भागवत जाधव, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, बापूसो साळुंखे, शिवाजी पाटील, शंकर पाटील, प्रकाश देसाई, तानाजीराव साठे, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रय जाधव, रामभाऊ साळुंखे, दत्ताजी पाटील, आकाश साळुंखे, रामचंद्र जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


















