सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली; बहुतांश कारखान्यांकडून ३९०० रुपये पहिली उचल जाहीर

सातारा : ऊसदरावरून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले असून, सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कारखानदारांनी आपापले ऊसदर जाहीर केले. शेतकरी संघटनांच्या आक्रमक आंदोलनांमुळे कारखानदारांना दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. स्वराज कारखान्याने सर्वाधिक ३९११ रुपये दर जाहीर केला असून, श्री दत्त इंडिया आणि शरयू कारखान्यांनी प्रत्येकी ३९१० रुपये देण्याचे मान्य केले आहे. दुसरीकडे, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने सर्वांत कमी म्हणजे ३६०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला आहे. किसन वीर आणि खंडाळा कारखान्यांचे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत.

जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. कोल्हापूर पॅटर्ननुसार एकरकमी ३९०० रुपये पहिली उचल मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा संघटना आणि अन्य शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला होता. सोमवारी जयपूर (ता. कोरेगाव) येथील शिवनेरी शुगर्सने प्रतिटन ३९०० रुपये दर जाहीर केला. त्यानंतर कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री आणि जयवंत शुगर्सनेही याच दराने पहिली उचल देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीकडे शेतकरी आणि कारखानदारांचे लक्ष लागले होते.

ChiniMandi WhatsApp Channel

आठ प्रमुख कारखान्यांकडून ३९०० रुपयांचा दर

बैठकीत शिवनेरी शुगर्स, जयवंत शुगर्स, सह्याद्री, रयत अथणी, जरंडेश्वर, कृष्णा, ग्रीन पॉवर आणि अजिंक्यतारा या आठ प्रमुख कारखान्यांनी प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले. श्री दत्त इंडिया आणि शरयू कारखान्यांनी ३९१० रुपये दर देण्याचे मान्य केले आहे.श्रीराम, खटाव-माण आणि प्रतापगड या कारखान्यांनी प्रतिटन ३८०० रुपये दर जाहीर केला. तर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने ३६०० रुपये दर निश्चित केला आहे. किसन वीर आणि खंडाळा हे दोन कारखाने बुधवारी आपापले दर जाहीर करणार आहेत.

दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांची दरात आघाडी

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात एकूण १७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. पश्चिम भागातील कारखान्यांकडून अधिक दराची अपेक्षा असताना दुष्काळी फलटण तालुक्यातील स्वराज कारखान्याने ३९११ रुपये दर जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. श्री दत्त इंडिया आणि शरयू कारखान्यांनीही ३९१० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने मात्र सर्वांत कमी ३६०० रुपये दर जाहीर केला आहे.शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे यापूर्वी ३७०० रुपयांच्या आसपास दर देण्याच्या भूमिकेवर असलेल्या कारखानदारांना दर वाढवून ३९०० रुपयांपर्यंत यावे लागले. बहुतांश कारखान्यांनी हा दर मान्य केल्याने जिल्ह्यातील ऊसतोडणी आणि वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काटामारीच्या तक्रारींची होणार तपासणी

बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी काही साखर कारखान्यांकडून ऊस वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. यावर वजन, मापे व काटे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि संघटनांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून कारखान्यांतील वजनकाट्यांबाबत जनजागृती करण्यात येईल, असे स्पष्ट केले.ज्या कारखान्यांच्या वजनकाट्यांबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

साखरेच्या विक्रीदरानुसार पुढील रक्कम

पहिल्या उचलीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना मिळणारी उर्वरित रक्कमही देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शवली आहे. शेजारील जिल्ह्यांतील कारखान्यांकडून दिला जाणारा दर आणि साखरेच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन पुढील रक्कम निश्चित केली जाणार आहे. तसेच रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार (७०:३० सूत्र) साखरेच्या विक्रीदराचा विचार करून शेतकऱ्यांना उर्वरित पैसे देण्याबाबत कारखानदारांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here