मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) थकबाकीचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला. २०२५-२६ च्या गाळप हंगामात बहुतांश साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली असली, तरी शेतकऱ्यांचे सुमारे २९८ कोटी रुपये अद्यापही बाकी असल्याची माहिती समोर आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील २१० साखर कारखान्यांनी एकूण १,०४५.६३ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष एफआरपीपोटी ४०,१४८ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, एकूण एफआरपीपैकी ९९.२६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे.
काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक दर दिला…
ऊस उत्पादकांना हार्वेस्टिंग आणि वाहतूक खर्चासह एकूण ४०,४४६ कोटी रुपये देय होते. त्यापैकी काही साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा जास्त दराने ऊस खरेदी केल्यामुळे एकूण ४१,४४४ कोटी रुपयांचे भुगतान झाल्याची नोंद आहे. त्यामुळे एकूण देयकांचे प्रमाण १०२.४७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, प्रत्यक्ष एफआरपीचा विचार करता ४०,१४८ कोटी रुपयेच अदा झाले असून, २९८ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप कायम आहे.
१६२ कारखान्यांनी केली शंभर टक्के एफआरपीची अदा…
राज्यातील १६२ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. याशिवाय ४३ कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के, दोन कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के, तर तीन कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपीची रक्कम दिली आहे. एफआरपीची थकबाकी न भरलेल्या १० साखर कारखान्यांविरोधात महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) जारी करण्यात आले असून, संबंधित कारखान्यांकडून थकीत रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


















