राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार; साखरेच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण पडला आहे. साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच विविध साखर कारखाना संघटनांचे प्रतिनिधी आणि आमदार उपस्थित होते. ‘चिनीमंडी’शी बोलताना महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले की, ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ChiniMandi WhatsApp Channel

गेल्या हंगामात विविध कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात घट झाली. परिणामी बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण होऊन दरात मोठी वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी किरकोळ बाजारात साखरेचे दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. पण हे दर विविध सरकारी उपाययोजनामुळे कमआय झाले आहेत. 9 सप्टेंबर रोजी एक्समिल दर 4800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल होते. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे प्रमुख सण येत असल्याने बाजारातील साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकरी आणि कारखानदारांचा लवकर गाळपाला विरोध

दरवर्षी राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र, यंदा १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा सरकारचा निर्णय आहे. मात्र, ऑक्टोबरमध्येच गाळप सुरू केल्यास शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे साखर कारखाना संघटनांनी लवकर गाळप सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे.दरम्यान, साखरेचे दर नियंत्रणात ठेवणे, आगामी सणासुदीच्या काळात बाजारात पुरेसा साखर साठा उपलब्ध ठेवणे आणि संभाव्य साखरटंचाई टाळणे, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here